आयुक्तांनी पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घ्यावी-सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांची मागणी
![Commissioner should take possession of Punawale waste depot site: Demand of social activist Ramesh Waghere](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/pcmc-17.jpg)
पिंपरी – पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेऊन बिल्डर व राजकारणी लोकांचा डाव उधळून लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे, की पुनावळे येथे २० वर्षांपूर्वी कचरा डेपोचे आरक्षण टाकून काही बिल्डर व राजकारणी लोकांनी पुनावळे व आजूबाजूच्या गावांचे जमिनीचे भाव पाडले. त्यानंतर याच बिल्डरांनी व राजकारण्यांनी हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केली. त्यानंतर प्रशासनाला हाताशी धरून कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यास २० वर्षे विलंब केला.
त्यामुळे आयुक्तांनी पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेऊन त्यांचा डाव उधळून लावावा. मोशी कचरा डेपोची क्षमता संपली आहे. पुनावळे येथे ७४ एकर वन खात्याच्या जमिनीवर कचरा डेपोचे आरक्षण आहे. या जमिनीच्या मोबदल्यात शासनाला अंदाजे ४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
तसेच, पिंपरी सांडस येथे वन विभागाला पर्यायी जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून ७४ एकर जागा ताब्यात घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.