महाराष्ट्र बंदमध्ये पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे; महाविकास आघाडीचे आवाहन
![Citizens of Pimpri-Chinchwad should participate in Maharashtra Bandh; Appeal of Mahavikas Aghadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Mahavikas-aghadi.jpg)
पिंपरी – उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपाच्या मंत्री पुत्राने धावते वाहन घातले. यात पाच शेतक-यांचा दुर्दैवी अंत झाला. याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने सोमवारी (दि.11) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंद मध्ये पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या सहभागी व्हावे असे, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने केले.
बंदची माहिती देण्यासाठी पिंपरी मध्ये आज (शनिवारी) सर्वपक्षीय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक मारुती भापकर, ॲड. गोरक्ष लोखंडे, अशोक मोरे, विजय लोखंडे, फझल शेख, पांडुरंग पाटील, अनिल रोहम, उमेश खंदारे, राजेश वाबळे, डॉ. वसिम इनामदार, भाविक देशमुख, तुषार नवले, रामचंद्र बांगर आदी उपस्थित होते.
“मागील सात वर्षांपासून केंद्रात भाजपाची सत्ता आहे. देशभरातील जनतेला फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशातील लोकशाहीचा गळा घोटणारे हुकूमशाही निर्णय घेतले. अशा हुकूमशाही सरकारच्या धोरणामुळे देशातील सर्व थरातील सर्व समाज घटक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन पिंपरीतील आंदोलनात उपस्थित राहून केंद्र सरकार विरुध्द तीव्र निषेध नोंदवावा,” असे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये शहरातील सर्व शिवसैनिक सहभागी होतील. सर्व नागरिकांनीही सोमवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी करुन केंद्र सरकारचा निषेध करावा, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केले.