कोण म्हणतं अजित पवारांचे पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष…? दर सोमवारी पक्ष कार्यालयात स्वीय सहायकांचा ‘दरबार’!
![Who says Ajit Pawar ignores Pimpri-Chinchwad? 'Durbar' of self helpers in party office every Monday!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/E_ehRX9UUAcs6B9.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष केले, असा राजकीय होरा आता बंद होणार आहे. कारण, अजित पवार यांनी शहरात आणखी बारीक लक्ष घातले असून, प्रत्येक सोमवारी स्वीय सहायक शहर पक्ष कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे सोपे होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत युवा नेते पार्थ पवार यांचा मावळ मतदार संघातून पराभव झाला. ‘तळहातावरील फोडाप्रमाणे पिंपरी-चिंचवडला जपणाऱ्या अजित पवारांना हा पराभव अत्यंत वर्मी लागला. दरम्यान, विधानसभा निवडणुका आणि राज्यातील सत्तेचा सारिपाट सावरताना अजित पवार यांनी शहरात लक्ष घातले नाही, अशी चर्चा जोर धरु लागली. मात्र, प्रत्येक शुक्रवारी पुण्यात प्रशासकीय आढावा बैठक ही नियमित होत असे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची नियुक्ती, त्यानंतर नूतन कार्यालय आणि जनता दरबार याची घडी बसवल्यानंतर अजित पवार यांनी आपला मोर्चा पिंपरी-चिंचवडकडे वळवला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची वैयक्तिक यंत्रणा पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत होणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामान्य पदाधिकारी पर्यंत सर्वांशी थेट संपर्क करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योजना आखली आहे. यात त्याचे स्वीय सहाय्यक दर सोमवारी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. यातील सर्व माहिती थेट अजितदादांच्या पर्यंत पोहोचविणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवडकरांना राज्य सरकारशी संबंधित कामकाजासाठी निवेदने देणे, पत्रव्यवहार करणे सोयीचे जावे, यासाठी पिंपरी चिंचवड पक्ष कार्यालयात पवार यांनी त्यांचे दोन स्वीय सहायक नेमले आहेत. ते दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निवेदने स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, पक्षाचे कार्यालय हे केवळ पक्ष कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर सामान्य पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठीही हक्काचे व्यासपीठ बनावे, अशी अपेक्षा अजितदादाची आहे. म्हणून आता राज्य सरकारशी संबंधित कामांसाठी व शहरातील नागरिकांचे प्रश्न स्वीकारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार त्यांचे दोन स्वीय सहायक सरकारशी संबंधित कामकाजाबाबतची निवेदने, पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच, सार्वजनिक कामांबाबत मार्गदर्शनही करणार आहेत. या उपक्रमाचा सर्व पिंपरी चिंचवडकरांना वेळ आणि श्रमाच्या दृष्टीने फायदा होणार आहे.