कष्टकरी कामगारांचे 34 कायदे बदलण्याचा भाजपचा डाव – काशिनाथ नखाते
पिंपरी – भारतात सुमारे ४७ कोटी पेक्षा जास्त असंघटीत कामगार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा घटक असलेल्या या कामगारानां २१ व्या शतकात मालक, भांडवलदार वर्गाकडून मोठे शोषण होत आहे. सध्यस्थितीत भाजप सरकारकडून उद्योगपती धार्जिणे निर्णय घेतले जात असून तब्बल कामगारांच्या बाजूने असलेले ३४ कायदे बदलण्याचा घाट घातला आहे. यामूळे कामगार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असून न्याय हक्कासाठी संघर्षाची तयारी ठेवावी, असे मत कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चिंचवड येथे असंघटीत कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास साईनाथ खन्डिझोड, जिल्हा निमंत्रक भास्कर राठोड, समन्वयक मधुकर वाघ, माधुरी जलमवार, दादाभाई चव्हाण, धर्मेंद्र पवार, शांतांबाई मस्के, परिमुल्ला शहा, शैला कोळी, हाजीमलंग नदाफ, राधा रोकडे, विश्वंभर शिंदे आदी मजूर, कामगार, फेरीवाला, बांधकाम कामगार, सफाई कामगार उपस्थित होते .
नखाते म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक व औद्योगिक नगरी समजली जाते. मात्र, मुंबईसह महाराष्ट्रातील असंघटीत कामगारांना कायदा असूनही किमान वेतनसुद्धा मिळत नाही. कामगार हा दिवसाला १० ते १४ तास काम करूनही त्यांना सोई-सुविधा मिळत नाहीत. भविष्य निर्वाह निधी आणि विमा योजना या पासून कामगार वंचित राहू नये, आपल्या हक्काचे लाभ मिळवण्यासाठी मोठ्या आंदोलनाची गरज आहे, त्यासाठी संघर्ष करण्यास तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी प्रास्ताविक मधुकर वाघ यांनी केले. सूत्रसंचालन अजय कदम यांनी केले. तर दिनेश चव्हाण यांनी आभार मानले.