एअर इंडिया खरेदीसाठी बोली लावली; ८८ वर्षांनी ‘महाराजा’ पुन्हा टाटांकडे
![Bid for Air India purchase; After 88 years, 'Maharaja' is back to Tata](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Air-India.jpg)
नवी दिल्ली – केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर टाटा सन्स आणि स्पाइसजेट यांनी एअर इंडियाची १०० टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. ती नेमकी किती आहे. त्याचा आकडा जाहीर झालेला नाही. टाटा सन्स आणि स्पाइसजेटचे अजय सिंह यांनी ही बोली लावली आहे. एअर इंडियाची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. ती काल संपली. टाटा आणि त्यांची उपकंपनी स्पाइसजेटने बोली लावल्यामुळे ८८ वर्षांनंतर एअर इंडियाच्या महाराजाचा ताबा पुन्हा टाटांकडे येणार आहे.
टाटांनी १९३२ मध्ये विमान कंपनीची स्थापना केली होती. टाटा एअरलाईन्स असे तिचे नाव होते. १९४६ मध्ये तिचे नाव एअर इंडिया झाले होते. १९५३ मध्ये केंद्र सरकारने ही विमान कंपनी आपल्या ताब्यात घेतली. मात्र जे. आर. डी. टाटा हेच १९७७ पर्यंत एअर इंडियाच्या अध्यक्षपदी कायम होते. आता काही वर्षांपासून एअर इंडियाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर निर्माण झाला आहे. एअर इंडियावर ४३ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यापैकी २२ हजार कोटी एअर इंडिया एसेट होल्डिंग लिमिटेडकडे वर्ग केले आहेत. या कर्जाची हमी केंद्र सरकारने दिली आहे. म्हणून तोट्यात असलेली ही विमान कंपनी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार खासगी उद्योग समूहांकडून बोली मागवण्यात आल्या आहेत. त्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. या तारखेपर्यंत टाटा या स्पर्धेत आहे. त्यांनी एअर इंडियाच्या १०० टक्के हिस्सेदारी खरेदीसाठी बोली लावली आहे. मात्र त्याचा नेमका आकडा अद्याप जाहीर झालेला नाही. एअर इंडियाकडे १७३ विमानांचा ताफा आहे. देशांतर्गत ४,४०० आणि परदेशात १,८०० लँडिंग आणि पार्किंग स्लॉट त्यांच्याकडे आहेत. दर महिन्याला एअर इंडिया ४ हजार ४०० देशांतर्गत आणि १,८०० आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे करते.