महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करा – अमोल थोरात
![Take measures to prevent atrocities against women - Amol Thorat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/2Amol_Thorat_Pimpri_Final-e1629531376129.jpg)
पिंपरी चिंचवड | महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी, पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.यासंदर्भात थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारांना कोणाचाच धाक वाटेनासा झाला आहे. अनेक महिला अत्याचार होऊनही पोलीस चौकीत जायला घाबरतात त्यांच्यासाठी कॉल सेंटर उभारण्याची गरज आहे. मदतीसाठी व्हाट्सअप नंबरही दिला गेला पाहिजे. त्यामुळे महिला महिलांशी बोलतील त्यांना संकोच वाटणार नाही. गुन्ह्याची माहिती देण्यासाठी 100 नंबर आहे. त्याच धर्तीवर महिलांना मदतीसाठी एखादा नंबर दिला गेला पाहिजे. असे झाल्यास गुन्हे घडण्याआधीच ते रोखले जाऊ शकतील. गुन्ह्याचे लोकेशनही समजू शकेल.
महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद कारवाई करता यावी आणि गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी महाराष्ट्र सरकार शक्ती कायदा करणार असल्याचे सांगितले गेले होते .मात्र अद्याप त्या दिशेने पावले पडलेली नाहीत. महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्तीही केली गेलेली नाही. राजकारण बाजूला ठेवून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करावी. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी थोरात यांनी केली आहे