पहिला डोस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
![Restrictions on immersion of Ganesha in Pune, see what are the rules](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Ajit-Pawar-Mask.jpeg)
पुणे – पुण्यामध्ये जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्यावर भर असेल ज्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच प्रत्येकाचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर मग बुस्टर डोसचा विचार करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. असे असून देखील टेस्टींगची संख्या कमी करू नका, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र लस कमी उपलब्ध होत आहे. ती उपलब्ध करून घेण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू आहेत. टास्क फोर्सने केलेल्या सूचनेनुसार पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना दुसरा डोस मुदतीत मिळत नाही. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे अशा नागरीकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यासाठी लस प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्याशी विभागीय आयुक्तांची चर्चा झाली आहे. कंपनीवर प्रचंड ताण आहे. देशाच्या विविध भागात लस पुरविली जात आहे. त्यांचीही इच्छा पुण्याला प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्याची आहे. त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिरम कडून जादा लस उपलब्ध झाल्यास ती झोपडपट्टीतील नागरीकांना प्राधान्याने दिली जाईल. यावेळी अजित पवार यांना दोन डोस झालेल्या नागरीकांना बुस्टर डोसबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील सर्व नागरीकांचे शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतरच बुस्टर डोसचा विचार करू. बोस्टर डोस दिला पाहिजे. यावेळी अजित पवार यांनी इथून पुढे स्थानिक वृक्षांचे रोपण करा असेच आदेश वनविभागाला दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.