सर्जिकल स्ट्राइकवरून शत्रुघ्न सिन्हा यांची भाजपवर टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Shatrughan-Sinha_PT.jpg)
नवी दिल्ली: भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय घेणाऱ्या भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘सर्जिकल स्ट्राइकचं श्रेय घेण्यासाठी पोस्टर-बॅनर्स लावून मोठा गाजावाजा केला जात आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशची निर्मिती केली, तेव्हाही एवढे पोस्टर-बॅनर्स लागते नव्हते, जेवढे आज लागले आहेत,’ अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला फटकारले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्जिकल स्ट्राइकवरून भाजपला घरचा आहेर दिला आहे. ‘१९७१ मध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केली. तेव्हाही एवढे पोस्टर लागले नव्हते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकाळातही सर्जिकल स्ट्राइक झाली होती,’ असे सांगतानाच ‘सर्जिकल स्ट्राइक ही तर राष्ट्रहिताची गोष्ट आहे. त्यासाठी लष्कराला सलामच केला पाहिजे,’ असे म्हणाले.
‘सर्जिकल स्ट्राइकचा एवढा गाजावाजा का केला जात आहे. अशा प्रकारच्या कारवाया तर यापूर्वीही झालेल्या आहेतच. सर्जिकल स्ट्राइक हा लष्कराच्या रणनितीचा भाग आहे. त्याबाबतचे राजकारण का केले जात आहे?,’ असा सवालही त्यांनी केला. भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने श्रेय घेण्यासाठीच हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.