breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
राष्ट्रवादी नगरसेवक अविनाश टेकवडे खून प्रकरण ; एसीपी मोहन विधाते यांची होणार चौकशी
पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खून प्रकरणात पिंपरीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन विधाते व पिंपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. ए. मुजावर यांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत पुणे पोलीस आयुक्तांनी चौकशीचे करुन त्याचा अहवाल ११ जुलै २०१८ पर्यंत न्यायालयाला सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती सुर्योद्य शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा ३ सप्टेंबर २०१५ ला खून झाला होता. या प्रकरणी बाबू उर्फ सुर्योदय शेखर शेट्टी यांना अटक झाली होती. दरम्यान, या खून प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. तसेच त्यांनी या खून प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, तत्कालीन एसीपी मोहन विधाते व पीआय एस. ए. मुजावर यांनी स्थानिक राजकारण्यांच्या सांगण्यानुसार या प्रकरणात आपल्याला गोवल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे.
याविषयी शेट्टी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनयाचिकेवर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि रेवती मोरे-डोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांच्या खंडपीठाने टेकवडे खून प्रकरणात निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन विधाते आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक एस. ए. मुजावर यांची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. हे अधिकारी दोषी अढळल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, याचा अहवाल न्यायालयाने ११ जुलै २०१८ पर्यंत सादर करण्यासाठी न्यायालयाने सांगितले आहे, असेही सुर्योदय शेट्टी यांनी सांगितले.