धक्कादायक! अपहरण करून अल्पवयीन मुलाचा खून
![Shocking! Murder of a minor by kidnapping](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Murder-Imagae-1.jpg)
जालना |
घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव येथून १ ऑगस्ट रोजी अपहरण झालेल्या अनिकेत घुगे (वय १५) या अल्पवयीन मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी देवीदहेगाव येथील दोघांना अटक केली असून दोन्ही आरोपी १९ वर्षे वयाचे आहेत. या प्रकरणी घनसावंगी पोलिसांनी खून आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मृत अनिकेतचे वडील भाऊसाहेब घुगे यांनी १ ऑगस्ट रोजी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली होती. गावातील अण्णा भाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमास गेलेल्या आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
पोलीस तपासात अनिकेत घुगे याचा उसाच्या शेतात नेऊन डोक्यात दगड मारून आणि गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी देवीदहेगाव येथील महादेव नामदेव शिंदे आणि आकाश भगवान शिंदे (दोघांचे वय १९) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. अपहरण झालेल्या अनिकेत घुगे याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह उसाच्या शेतात आढळून आल्यानंतर मृताच्या वडिलांकडून त्याची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. घनसावंगी येथील सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे, उपनिरीक्षक पांडुरंग माने आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी तपास केला. जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात देवीदहेगाव येथे भेट देऊन पाहणी केली.