पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत; सांगली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही!
सांगली |
महापुराने हानी झालेल्या सांगली जिल्ह्य़ाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भेट दिली. त्यांचा हा दौरा महापुराची पाहणी, आढावा, संवाद आणि सोबत विरोधकांच्या निदर्शनांनी गाजला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अंकलखोप येथे पूरग्रस्तांशी संवाद साधला. केवळ मदतीच्या नावाखाली पॅकेजचा खोटारडेपणा आपण करणार नाही, मात्र पूरग्रस्तांना वाऱ्यावरही सोडणार नाही. सरकार म्हणून जी जबाबदारी आहे ती पार पाडली जाईल.
गेल्या आठवडय़ामध्ये आलेल्या महापुराने कृष्णा व वारणा नदीकाठच्या १०३ गावांसह महापालिकेला फटका बसला. महापुराने दोन लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले, तर हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांचे महापुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. या पाहणीसाठी आज मुख्यमंत्री ठाकरे सांगलीत आले होते. त्यांनी पलूस तालुक्यातील अंकलखोप, भिलवडी, मिरज तालुक्यातील डिग्रज या गावांसह महापालिकेतील बाधित क्षेत्राची पाहणी केली. सांगली शहरातील आयर्वनि पुलावर जाऊन शहरातील कोण-कोणता भाग पुराने व्यापला होता याची माहिती त्यांनी नकाशाद्बारे घेतली.
- भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
पूरग्रस्त भागाची पाहणी करून परतत असताना सांगलीतील हरभट रोडवर काही नागरिक निवेदन देण्यास थांबले असल्याचे समजल्यानंतर ठाकरे गाडीतून उतरले, मात्र याच वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरसकट व तत्काळ मदत मिळावी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसैनिकही पुढे सरसावल्याने गोंधळ वाढला. शिवसैनिक व भाजप कार्यकत्रे आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन शिवसनिकांना परत पाठविले.