Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

“किती मुलं, मुली आहेत…,” शाळेत निवारा घेतलेल्या कुटुंबाची अजित पवारांनी केली चौकशी

मुंबई |

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची भेट घेत असून झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. अजित पवार कोल्हापूर, सातारा आणि सांगली अशा तिन्ही जिल्ह्यांना भेट देणार होते. मात्र खराब हवामानामुळे अजित पवारांना कोल्हापूर दौरा रद्द करावा लागला आहे. दरम्यान अजित पवारांनी सांगलीतून दौऱ्याला सुरुवात तेली असून यावेळी त्यांनी भिलवडी परिसरातील पूरग्रस्त भागाला, स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना भेटी देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला व परिसराची पाहणी केली. अजित पवार यांच्यासोबत जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित आहेत.

अजित पवारांनी भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पुरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे? याची अजित पवारांनी माहिती घेतली. यावेळी त्यांनी तेथील कुटुंबाकडे आपुलकीने किती मुलं, मुली आहेत अशीही विचारणा केली. भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

  • भिलवडी बाजारपेठेची बोटीतून पाहणी

भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व इतर मान्यवर.

  • विश्वजीत कदम यांची विनंती

“अजित पवार, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आपण भिलवडी गावाला भेट देत त्यांचं दु:ख समजून घेतलं. यावेळी तीन विषय महत्वाचे आहेत. हे भिलवडी गाव कृष्णा नदीकाठी असल्याने पलूस तालुक्यातील २२ गावं अशी आहेत जी सातत्याने पुरामुळे प्रभावित होतात. या गावांमधील घरं पडली असून घरांमध्ये शिरलेलं पाणी हादेखील वेगळा विषय आहे. व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, करोनामुळे दीड वर्ष वाया गेलं असताना पुरामुळे परत नुकसान झालं आहे. गेल्यावर्षी १ ऑगस्टला आलेला पूर २० दिवस असाच होता. यावेळी पुराची ही सुरुवात २३ जुलैपासून सुरुवात झाली आहे. पाणी ओसरत असलं करी पुढचा दीड महिना काळजी घ्यावी लागणार आहे. शिराळा, पलूस, वाळव्यातील काही गावांमध्ये कायम स्वरुपात पुनर्वसन करण्याची गरज आहे. प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वात नेमलेल्या समितीचा अहवाल तपासण्याची गरज आहे,” अशी विनंती यावेळी विश्वजीत कदम यांनी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button