भास्कर जाधवांकडून महिलेला अरेरावी: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोचले कान…
![Bhaskar Jadhav slams woman: Shiv Sena MP Sanjay Raut pierces ears](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/sanjay_Raut_bhaskar_jadhav.jpg)
मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२५ जुलै) चिपळूण शहराचा दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतानाच मुख्यमंत्र्यांनी लोकांचं समस्याही ऐकूण घेतल्या. मात्र, या पाहणीवेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला केलेल्या अरेरावीवरून वादंग निर्माण झालं आहे. भास्कर जाधवांवर टीका होत असून, चिपळूणमध्ये घडलेल्या या प्रकारावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भास्कर जाधवांचे कान टोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण भेटीवेळी एक महिला मुख्यमंत्र्यांना मदतीची विनवणी करत होती. यावेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महिलेशी अरेरावी केली. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर भास्कर जाधव यांच्या वर्तणुकीवर टीका होत आहे. याबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली.
चिपळूणमध्ये झालेल्या घटनेबद्दल बोलताना राऊत म्हणाले,”भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही; वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचं आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आणि सरकार हे करत आहे”, अशी भूमिका मांडत राऊत यांनी भास्कर जाधव यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. “महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. प्रचंड नुकसान झाले. अनेकांचे जीव गेले आहेत. असंख्य कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत, त्या सगळ्यांना आता सावरायचं आहे. महाराष्ट्र सरकारचा पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारनेसुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी लागेल. मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा जास्त लक्ष महाराष्ट्राकडं द्यावं. महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गावं उद्ध्वस्त झाली आहेत. त्या गावांना आता पुन्हा एकदा उभं करावं लागेल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.