अरेरावी केल्यामुळे वादात अडकलेले भास्कर जाधव पुन्हा चिपळूणमध्ये दाखल
![Bhaskar Jadhav, who was embroiled in controversy due to arrears, re-entered Chiplun](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Bhaskar-Jadhav-1.jpg)
मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवार) चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. चिपळूण बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी एका महिलेनं मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही महिलेचं म्हणणं ऐकून धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आरेरावी केल्याचा प्रकार त्यावेळी घडला. त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांचं वागण्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, भास्कर जाधव या वादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथील बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नुकसान झालेल्या दुकानदारांशी त्यांनी चर्चा केली. जे नुकसान झालं असेल. त्याच्या भरपाईबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच सध्या मॅनपॉवर नाही आहे. लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात येईल, असे भास्कर जाधव म्हणाले. मात्र कालच्या घटनेबाबत भास्कर जाधव यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
- काय घडले होते-
मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं ते सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र नेमकं त्याचवेळी भास्कर जाधव यांनी महिलेला “आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव” अशी प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहे.