पुरेशा लस साठ्याअभावी पुन्हा ब्रेक; मुंबईत आज लसीकरण बंद
![रायगडात शिक्षकांच्या लसीकरणाचा गोंधळ; आधी दुर्लक्ष आणि आता शिक्षकांना नोटिसा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/freepressjournal_2020-12_8b283059-f65c-43f0-9e9e-4777a69ed99d_vaccine_data.jpg)
मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीमेमध्ये अनेक अडथळे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल, मंगळवारी दिनांक 20 जुलै, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील काही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. तर आज, बुधवार दिनांक 21 जुलै 2021 रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद असणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे.
तसेच लससाठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. त्यामुळे मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, देशासह राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळतेय. मात्र हे जरी खरे असले तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या लसीकरण हा एकमेव मार्ग आहे, असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जात आहे. अशातच जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे. महापालिकेला गेल्या आठवड्यातील शुक्रवारी लसींचा साठा मिळाला होता. परंतु मुसळधार पावसामुळे शनिवारी लसीकरण कमी झाले होते. तसेच रविवारी आठवडा सुट्टी असल्यामुळे लसींचा उरलेला साठा सोमवारी आणि काही प्रमाणात मंगळवारी वापरण्यात आला. त्यानंतरचा साठा मंगळवारी येणे अपेक्षित होते. मात्र तो प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण बंद ठेवण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली आहे.