नाणारचा प्रकल्प जहर, तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे – शिवसेना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/NANAR-PROJECT-1.jpg)
मुंबई : नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपामधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन भाजपाला इशारा दिला आहे. ”कोकणातील शेती, फळबागा हा रोजगार आहे. त्या सगळ्याचे थडगे बांधून कोणत्या रोजगाराची निर्मिती भाजप सरकार करणार आहे? कोकणची जनता सुखी आहे. त्यांच्या सुखात विष कालवू नका. तसा प्रयत्न कराल तर कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्यात माती खायला लावू, हा आमचा शब्द आहे. नाणारचा प्रकल्प हे जहर आहे. तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे आहे. लादून बघाच, हे आमचे आव्हान आहे!!”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत सामना संपादकीयमधून इशारा दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी फक्त केंद्रातलेच नव्हे तर राज्याराज्यांतील ‘पर्यावरण’ खाती आता कायमचीच बंद करायला हवीत. पर्यावरण स्वयंसेवकांनी, जनतेने निसर्ग आणि पर्यावरण रक्षणासाठी मर मर मरायचे आणि केंद्रातील उपटसुंभांनी पर्यावरणाचा खून करणारे विषारी रासायनिक प्रकल्प जनतेच्या छाताडावर आणायचे. त्यामुळे ‘पर्यावरण प्रेम’ हे एक ढोंगच ठरले आहे व नाणारच्या विषारी प्रकल्पाने केंद्राचे हे ढोंग पुन्हा उघडे पडले आहे. रत्नागिरीतील आंबा, फणस, काजू, शेतजमिनी, समुद्र, नद्या, मासेमारी यांचा विनाश करणारा हा प्रकल्प आहे. या भकभकणाऱ्या विषप्रकल्पामुळे लोकांना कॅन्सर, दमा व इतर छातीच्या विकारांना सामोरे जावे लागेल असे सामनात म्हटले आहे.
कोकणातील स्वच्छ हवा आणि पाण्याचे विषात रूपांतर करणाऱ्या प्रकल्पास जनतेचा विरोध असतानाही तो लादला जात असेल, जनतेचा विरोध पायदळी तुडवला जात असेल तर ही आणीबाणी आहे. मोदी-फडणवीस सरकारची हुकूमशाही आहे. अशी हुकूमशाहीच करायची असेल तर या मंडळींचे आणीबाणीच्या विरोधात ४३ वर्षे बोंबलण्याचे सर्व ढोंगच होते. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल करून जगाचा थरकाप उडवला तसे आमच्या कोकणी बांधवांना त्यांच्या घरादारांसह, शेतजमिनीसह विषारी गॅस चेंबरमध्ये मारण्याचा हा कट असल्याचे सामनात सांगण्यात आले आहे.
‘नाणार’ हे कोकणचे ‘गॅस चेंबर’ होईल म्हणून आमचा विरोध आहे आणि राहणार. नाणार ग्रामस्थांचा विरोध असेल तर रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द होता. नाणार पंचक्रोशीतील एकजात सर्व ग्रामपंचायतींनी हा विषारी प्रकल्प नको असे बहुमताचे ठराव मंजूर केले व मुख्यमंत्र्यांच्या हातात सोपवले.