शरद पवारांच्या भेटीनंतर निवडणूक चाणक्य प्रशांत किशोर राहुल गांधीच्या भेटीला
![After Sharad Pawar's visit, Election Chanakya met Prashant Kishor Rahul Gandhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/नाना-पाटोळे-हे-महत्त्वाची-व्यक्ती-त्यांनी-गांभीर्याने-घेऊ-नये-संजय-राऊत-यांचा-मोलाचा-सल्ला.-9.jpg)
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची गेल्या महिन्यात तीनवेळा भेट घेणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला पोहोचले आहेत. नवी दिल्लीतल्या राहुल यांच्या निवासस्थानी ही भेट सुरू आहे. या बैठकीला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि वरिष्ठ नेते वेणुगोपालदेखील उपस्थित आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह ५ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल आणि किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट झाली होती. एकाच महिन्यात तीनदा पवार आणि किशोर यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आता किशोर काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीला पोहोचले आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणीपूर, गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल आणि किशोर यांची भेट होत असल्याचं बोललं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांना आज लखनऊला जायचं होतं. मात्र, प्रशांत किशोर यांच्यासोबत अचानक मिटिंग ठरल्याने लखनऊचा दौरा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर आज प्रशांत किशोर राहुल गांधी आणि प्रियंका यांना भेटले. यावेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. त्यामुळे पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती ठरविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.