देशात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज
![Rain forecast with thunderstorms for the next two-three days in some parts of the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/iStock-547033564.jpg)
मुंबई – अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात यंदा मोसमी पावसाने वेगाने प्रगती केली. 5 जूनला कोकणातून दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवसांतच त्याने राज्य व्यापले. मात्र काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी, तर काही ठिकाणी सरासरीच्या दुप्पटीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या पहिल्या टप्प्यातील पहिल्याच महिन्यात राज्यात असमान पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आता पुढील पाच दिवसांत देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. नैऋत्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांच्या दिशेने पुढे सरकण्याची अधिक शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
1 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस अनेक राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाबरोबरच बर्फवृष्टीही होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.