गणेश चतुर्थीला येणार जगातील सर्वात स्वस्त जिओचा स्मार्टफोन
![The world's cheapest Geo smartphone will arrive on Ganesh Chaturthi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/83811508-e1624590498759.jpg)
रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भारतात जिओ-फोन नेक्स्टची घोषणा केली आहे. जिओ फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगात सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा वार्षिक सभेदरम्यान या फोनची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी केला आहे.
हा फोन गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे १० सप्टेंबरला लाँच केला जाणार आहे. भारताला टू-जी मुक्त करायचे असेल, तर सर्वांना परवडेल अशा खर्या अर्थाने स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे. त्या आधारावर जिओ आणि गुगल यांनी मिळून जिओ फोन नेक्स्ट डेव्हलप केला असून भारतात तो लाँच केला जाणार आहे, असे मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.
जिओ आणि गुगलने संयुक्तपणे हा फोन तयार केला असून तो पूर्णपणे फीचर स्मार्टफोन असणार आहे. या फोनसाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचे ऑप्टिमाईज्ड व्हर्जन तयार करण्यात आले आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड, गुगल आणि जिओचे सर्व मोबाईल अॅप्लिकेशन्स युजर्सला वापरता येणार आहेत.
खास भारतीय बाजारपेठेसाठी गुगल आणि जिओने संयुक्तपणे हा फोन विकसित केला असून इतर स्मार्टफोन फीचर्सप्रमाणेच या फोनमध्ये अनेक फीचर्स असणार आहेत, अशी माहिती यावेळी मुकेश अंबानी यांनी दिली. दरम्यान, या फोनची किंमत एजीएममध्ये जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
या नव्या फोनची किंमत जरी जाहीर करण्यात आली नसली, तरी हा फोन या वर्षी १० सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच केला जाईल, असे मुकेश अंबानी यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे लवकरच देशाला टूजी मुक्त करता येणं शक्य होणार असल्याचं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसांत या फोनची किंमत देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये व्हॉइस असिस्टन्स, ऑटोमॅटिक रीड अलाऊड, स्मार्ट कॅमेरा असे फीचर्स असणार आहेत. जिओ फोन नेक्स्ट आधी भारतात लाँच केला जाईल आणि नंतर जगभरातल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.