चिंताजनक! महाराष्ट्रात सात रुग्णांमध्ये आढळला ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’
![39,742 new corona patients in the country; 39,972 coronal free](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-5174671_1920-1-5.jpg)
मुंबई – देशातील दैनंदिन रुग्णवाढ काहीशी कमी झालेली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. राज्यात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळून आले आहेत. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघरमध्ये डेल्टा प्लसचे सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती आणि आता याच व्हेरिएंटचे म्युटेशन झाल्याने जोखीम वाढली आहे.
या व्हेरिएंटमुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ ते १० लाखांपर्यंत जाऊ शकते आणि यातील १० टक्के रुग्ण लहान मुलं असू शकतात असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, ‘नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. आम्ही काही नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल,’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर)चे संचालक डॉ. लहाने यांनी दिली.
दरम्यान, डेल्टा प्लसचे सातपैकी पाच रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण आढळलेली गावे बंद करण्यात आली असून कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत.