#Breaking! माजी आमदार शंकर सखाराम नम यांचे निधन
![#Breaking! Former MLA Shankar Sakharam Nam passes away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/shankar-Nam.jpg)
मुंबई |
आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे माजी आमदार शंकर सखाराम नम (७२) यांचे आज(शनिवार)हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं, मुलगी असा परिवार आहे. शंकर नम यांनी आपल्या कार्याची सुरूवात जंगल कामगार सोसायटीमधून केली. तत्कालीन डहाणू विधानसभेचे आमदार भाई कडू यांच्या निधनानंतर त्यांना काँग्रेसकडून आमदारकीचे तिकीट मिळाले व त्यांनी सुमारे १७ वर्षे डहाणू विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे पसंद केले. त्यांना राष्टवादीकडून पूर्वीच्या डहाणू लोकसभेचे तिकीट मिळाले व ते खासदार म्हणून निवडून आले.
मात्र पंतप्रधान अटल बिहारी वाजेपेयींचे सरकार अल्पावधीत पडल्यामुळे त्यांची खासदारकी लवकर संपुष्टात आली. पुढे लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत अॅड. चिंतामन वनगा यांनी नम यांचा पराभव केला. नंतर त्यांनी दोनवेळा डहाणू विधानसभेची निवडणूक लढवली मात्र दोन्ही वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ते आदिवासी भाषेत अस्खलितपणे आपले मत मांडून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असतं. आमदार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी त्यांना उपमंत्रीपद व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले होते. आता एक स्पष्ट बोलणारा व तळागाळातील आदिवासी समाजाचा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने पालघर जिल्ह्यात सर्वत्र दुःख व्यक्ते केले जात आहे.