‘ती’ श्वसनयंत्रे वापरासाठी योग्यच- देवेंद्र फडणवीस
![‘She’ is suitable for respiratory use - Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Pm-care-fund-ventilator.jpg)
हिंगोली |
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अपवाद वगळता हिंगोली व परभणी येथील पंतप्रधान कल्याण निधीतून प्राप्त झालेले श्वसनयंत्रे पूर्णपणे सुरू आहेत. वापर नसल्याने श्वसनयंत्रे नादुरुस्त दाखवत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे गुरुवारी सांगितले. जिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकार बैठकीत बोलत होते. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी या वेळी उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी करोना रुग्णासंदर्भात चर्चा केली. प्राणवायू प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली. या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष जाधव, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आमदार गजानन घुगे आदी उपस्थित होते.
या वेळी फडणवीस यांनी श्वसनयंत्रे बंद असल्याबाबतचे आरोप फेटाळून केंद्र शासनाची पाठराखण केली. ते म्हणाले, पंतप्रधान कल्याण निधीतील श्वसनयंत्रे काही ठिकाणी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उघडलेच गेले नसल्याने काही तांत्रिक दोष निर्माण झाले असतील. औरंगाबाद वगळता सर्व व्हेंटिलेटर व्यवस्थित सुरू आहेत. हिंगोलीतील प्राणवायू प्रकल्पही सुरू आहे. राज्यात कोविडमुक्त झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना म्युकरमायकोसिस आजाराच्या लक्षणांबाबत माहिती देणे आवश्?यक आहे. या आजाराचे आतापर्यंत ५ हजार रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराची इंजेक्शन महागडी असल्याने ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शासनाने शासकीय व खासगी रुग्णालयात इंजेक्शन मोफत दिली पाहिजे असेही ते म्हणाले. पीककर्ज वाटपाच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पीक विमा कंपनी काही केंद्र शासनाची नाही, असेही ते म्हणाले.
- ओबीसी आरक्षणाबाबत काय केले?
ओबीसी आरक्षणासाठी राज्यातील मंत्री एकीकडे आंदोलन करीत असताना दुसरीकडे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी त्यांच्यातून कोणीही हजर झाले नाही. पंधरा महिने शासनाने झोपा काढल्या काय? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी भाजपा तीव्र आंदोलन करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.