अली जाफरकडून मीशा शफीला 1 अब्ज रुपयांची नोटीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/meesha-shafi.jpg)
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी ऍक्ट्रेस मीशा शफीने पाकिस्तानचाच एक कलाकार अली जाफरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यावेळी तर अली जाफरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता तो गप्प बसणार नाही. आपल्यावरच्या आरोपांना त्याने कायदेशीर उत्तर द्यायचे ठरवले आहे.
आपल्यावरच्या आरोपाबद्दल त्याने मीशा शफीच्याविरोधात लाहोरच्या कोर्टामध्ये तब्बल एक अब्ज रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. मीशा शफीने केवळ आपली बदनामी करण्यासाठीच हे आरोप केले होते, असे त्याने मीशाला पाठवलेल्या नोटीसीत म्हटले आहे. अलीवर खोटे आरोप केले की प्रसिद्धी मिळू शकते, असे मीशाला वाटले आहे. म्हणूनच प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने तिने हे आरोप केल्याचा दावाही अलीने केला आहे.
मीशाने “मी टू’ कॅम्पेनदरम्यान अलीविरोधात ट्विट केले होते. हे ट्विट ताबडतोब हटवण्यात यावे आणि त्यातील आरोपांबद्दल माफी मागावी अशी मागणीही अलीने केली आहे. या ट्विटमुळे झालेल्या मानसिक छळाबद्दल 2 कोटी, कॉन्टॅक्ट्सच्या नुकसानीबद्दल 8 कोटी, गुडविल आणि प्रतिष्ठेच्या नुकसानीबद्दल 50 कोटी आणि व्यवसायिक नुकसानीबद्दल 40 कोटी रुपयांची भरपाईची मागणी त्याने केली आहे. अलीची नोटीस आपल्याला मिळाल्याचे मीशानेही मान्य केले आहे.