महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी
![Give 20 lakh doses of vaccine to Maharashtra every week, Rajesh Tope demands from the Center](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/rajesh-tope-.jpg)
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढली आहे. याशिवाय राज्यात कोरोना लसीकरण मोहीम देखील राबवली जात आहे. सरकारकडून सातत्याने पात्र नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवता यावा यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस द्यावे, अशी मागणी केंद्राकडे केली आहे.
वाचा :-सर्वच सरकारी बँकांचे खासगीकरण होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
राजेश टोपे हे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली.
राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात येत असून, या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी यांच्यासह 60 वर्षांवरील आणि 45 वयोगटावरील सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये 1.77 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्वांना पहिला डोस मे महिन्यापर्यंत तर दुसरा डोस जूनपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी 2.20 कोटी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या डोसची आवश्यकता आहे, असे टोपे यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्राकडे केली.