पतीसमोर विवाहितेवर बलात्कार; घटस्फोटीत नवऱ्याच्या भावाचे कृत्य
![Rape of a married woman in front of her husband; The act of the husband of the divorced husband](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/rape-1-1.jpg)
मुंबई |
महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा राजकारणात उग्र होत असताना या घटनांचं सत्र मात्र सुरूच आहे. एका महिलेवर तिच्या पतीसमोरच घटस्फोटीत नवऱ्याच्या भावाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिला तिच्या कुटुंबासोबत घरी जात असताना आरोपीने चार जणांच्या मदतीने हे कृत्य केलं. राजस्थानातील बारण जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित महिला दुसऱ्या पतीसह मुलगा आणि लहान बहिणीसह शनिवारी रात्री घरी जात होती. त्याचवेळी छाजवर गावाजवळ तिच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या भाऊ आणि चार जण त्यांना भेटले. त्यांनी पीडितेसह तिच्या कुटुंबियांना शेतात नेले. त्यानंतर तिच्या नवऱ्यावर हल्ला केला आणि त्याचे हातपाय दोरीने बांधले. त्यानंतर पतीसमोरच आरोपीने महिलेवर बलात्कार केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेंद्र सिंह यांनी दिली आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाला. त्यानंतर महिला पतीसह लहान मुल आणि बहिणीला घेऊन कशीबशी मुख्य रस्त्यावर आली. त्यानंतर त्यांनी जाणाऱ्या प्रवाशांना मदत मागितली. प्रवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अपहरण करणे आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेची रविवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, बलात्कार करणाऱ्या आरोपीसह दोघांना अटक केली आहे. मुल होत नसल्याने पीडित महिला वयाच्या विशीमध्येच तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर महिलेनं पारंपरिक रुढी असलेल्या नाटा प्रथेनुसार दुसरं लग्न केलं होतं.
वाचा- पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द