मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी
![Maratha reservation case, Supreme Court agrees to send notice to all states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/sc-maratha-reservation.jpg)
नवी दिल्ली – मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या त्रिसदस्यीय खंपीठाने मराठा आरक्षणास स्थगिती देऊन हे प्रकरण पाच सदस्यीय पीठाकडे सोपविले होते. त्यानुसार आता मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे 8 मार्च ते 18 मार्च अशी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे.
वाचा :राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 22,19,727 वर
पाच सदस्यीय खंठ पीठाने ५ फेब्रुवारीला सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले होते. त्यानुसार 8, 9, 10 मार्च रोजी मराठा आरक्षणाच्या विरोधातले युक्तिवाद करणार आहेत. तर १२, १५. १६ आणि १७ तारखेला मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि आरक्षण समर्थकांतर्फे युक्तिवाद होतील. त्यानंतर १८ मार्चला काही नवे मुद्दे असल्यास त्यासंबंधी सुनावणी होईल. त्याचदिवशी केंद्राच्या वतीने ॲटर्नी जनरल बाजू मांडणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी ५ फेब्रवारी रोजी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारची बाजू मांडताना वकील मुकूल रोहतगी यांनी सांगितले होते की, दस्तऐवजांच्या खंडांच्या प्रिंट काढायच्या असून, त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करावी, अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मराठा आरक्षणात ५० टक्के आरक्षणाच्या उल्लंघनाचा प्रश्न अंतर्भूत असल्याने हे प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे द्यावे, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. इंद्रा सहानी प्रकरणात ९ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निकाल दिला होता. त्यामुळे ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाच्या मागणीबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडेही लक्ष लागले आहे.