माथाडी कामगार आणि कंपनी व्यवस्थापनातील संघर्ष टाळण्यासाठी समन्वय समिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/irfan-sayyed-1-1-1.jpg)
- राज्य सरकार, माथाडी कामगार व उद्योग प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश
- पिंपरी-चिंचवडचे कामगार नेते इरफान सय्यद यांची माहिती
पिंपरी / महाईन्यूज
माथाडी कामगार आणि कंपनी व्यवस्थापनातील संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकार, माथाडी कामगार आणि उद्योग प्रतिनिधींची समन्वय समिती स्थापण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे. कामगार नेते इरफान सय्यद, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबने या तिघा पुणेकरांचा २७ जणांच्या समितीत समावेश आहे.
उद्योजक, व्यापारी आणि माथाडी, हमाल आणि श्रमजीवी कामगारांमध्ये विविध प्रश्नांवर अनेकदा संघर्षाची स्थिती निर्माण होते. या घटकांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. कामगारमंत्री समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. सचिव आणि कामगार आयुक्त समिती सदस्य असतील. याशिवाय विधिमंडळातील सदस्य, उद्योग आणि कामगार प्रतिनिधींचाही यात समावेश असणार आहे.
कामगार नेते व पिंपरी चिंचवड माथाडी मंडळाचे सदस्य इरफान सय्यद म्हणाले की, राज्यात ३६ माथाडी मंडळे आहेत. कामगारांच्या अडचणी, कारखाने आणि इतर व्यवसायात असणाऱ्या हमाल कामगारांना माथाडी कामगारांचे संरक्षण मिळण्यासाठी या समितीचा उपयोग होईल.