केजरीवाल यांचे धरणे आंदोलन समाप्त…

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयात केलेले धरणे आंदोलन आज समाप्त केले. दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी “आप’च्या मंत्र्यांबरोबरच्या बैठकांना उपस्थित रहायला सुरुवात केल्यावर केजरीवाल यांनी हे धरणे आंदोलन थांबवले असे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले. आज दिवसभरात अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्याचेही सिसोदिया यांनी सांगितले.
दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना फेब्रुवारी महिन्यात मारहाण झाल्यानंतर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी “आप’च्या मंत्र्यांबरोबर असहकार पुकारला होता. तेंव्हापासून “आप’चे मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्धच सुरू होते.
नायब राज्यपालांच्या कार्यालयातून केजरीवाल आणि अन्य मंत्री बाहेर पडल्यावर हे धरण आंदोलन समाप्त झाले. मात्र हे धरणे नव्हते. आम्ही केवळ नायब राज्यपालांची भेट घेण्यासाठी वाट पहात होतो, असेही सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितले.





