चीनी मालावर आणखी कर लागू करण्याची ट्रम्प यांची धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/usa-china-696x392.jpg)
वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाने आता शिखर गाठले असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी मालावर आणखी दोनशे अब्ज डॉलसचे कर लागू करण्याची धमकी दिली आहे. चीनने अमेरिकेच्या मालावर अन्यायकारक कर लागू करण्याची प्रथा बंद केली नाही तर आम्हाला ही उपाययोजना करण्याखेरीज गत्यंतर उरणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने मागच्याच आठवड्यात चीनी मालावर एकूण 50 अब्ज डॉलर्सचे कर लागू केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेहून आयात केल्या जाणाऱ्या 659 वस्तुंवर एकूण 50 अब्ज डॉलर्सचा कर लागू केला आहे. चीने अत्यंत असमान पद्धतीने व्यापारातील कररचना केली असून त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
चीनने ही वाढीव कररचना मागे घ्यावी अशी सुचना त्यांनी चीनला वारंवार केली असली तरी चीनने त्यांना दाद दिलेली नाहीं. उलट अमेरिकेच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून त्यांनीही अमेरिकन मालांवर अतिरीक्त कर लागू केला आहे. आता त्यांनी पुन्हा कर वाढ केली तर आम्ही थेट दोनशे अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर चीनी मालावर लागू करू अशी धमकी ट्रम्प यांनी दिली असल्याने त्याला आता चीन कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरले आहे.