पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती?
![Appointment of Rajesh Patil as Pimpri-Chinchwad Municipal Commissioner?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Rajesh-Patil-PCMC.jpg)
- विद्यमान आयुक्त श्रावण हर्डिकर यांची बदली निश्चित
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी आता राजेश पाटील यांची नियुक्ती होणार आहे. विद्यमान आयुक्त श्रावण हर्डिकर यांची बदली निश्चित झाली असून, लवकरच पाटील आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
ओडिशामध्ये प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणारे राजेश पाटील २००५ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या स्कील इंडिया उपक्रमांतर्गत त्यांनी काम पाहिले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना पिंपरी-चिंचवड आयुक्तपदी नियुक्त करण्यात येईल, अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र, राजेश पाटील यांचे नाव आता आघाडीवर आहे. राजेश पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत.
राजेश पाटील यांचा थोडक्यात आढावा…
स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.