बोगस ‘एफडीआर’ : पिंपरी-चिंचवड महापालिकेकेडून पाच कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे!
![Bogus 'FDR': Pimpri-Chinchwad Municipal Corporation commits fraud against five companies!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/बोगस-एफडीआर-प्रकरणी-महापालिका-आयुक्तांचा-दणका.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
महापालिकेची विविध कामांच्या निविदा घेताना एफडीआर व बँक गॅरेंटी घेतली जाते. अशी बँक गॅरेंटी व एफडीआरच्या बनावट पावत्या देऊन महापालिकेची फसवणूक करणार्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पाच व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पाटील अँड असोसिएटचे मालक सुजित सूर्यकांत पाटील (वय २६, कार्यालय जयगणेश साम्राज्य, भोसरी), कृती कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल हनुमंत कुर्हाडे (वय २९, रा. नेहरुनगर), एस बी सवईचे मालक संजय बबन सवई (रा. जयमल्हारनगर, थेरगाव, चिंचवड), वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे (वय ४७, रा. सुशिाल अपार्टमेंट, भोसरी), डी़ डी़ कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवानी (वय २८, रा. सुपर प्लाझा, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पालिकेच्या कर्मचार्यांनी फिर्याद दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागामधून स्थापत्य विषयक कामांच्या निविदा निघतात. त्यामध्ये सर्वात कमी दर घेणार्या ठेकेदाराला निविदा दिल्या जातात. निविदेच्या अनुषंगाने त्यांच्याकडून एफडीआर व बँक गॅरेंटी घेतली जाते. मात्र, अनेकांनी कामे घेताना बनावट बँक गॅरेंटी दिल्याचे उघड झाले आहे. सुजित पाटील यांनी ५ कामे घेतली होती. त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक आळंदी शाखेकडील एफडीआर/ बँक गॅरेंटी दिली होती. ती बनावट असल्याचे आढळून आले.
कृती कन्स्ट्रक्शनचे विशाल कुर्हाडे यांनी ४ कामे घेतली होती. त्यांची ठाणे जनता सहकारी बँकेची बँक गॅरेंटी बनावट निघाली आहे. एस बी सवईचे मालक संजय सवई यांनी ७ कामे घेतली होती. त्यांनीही ठाणे जनता बँकेच्या आळंदी शाखेची बँक गॅरेंटी बनावट निघाली आहे. दयानंद मळगे यांनी १२ कामे घेतली होती. त्यांनी बँक आॅफ महाराष्ट्र, राजगुरुनगर शाखा व पंजाब नॅशनल बँक नाना पेठ यांची बनावट बँक गॅरेंटी दिली होती. दिनेश नवानी यांनी तब्बल २४ कामे घेतली होती. त्यासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँक, नाना पेठेची बनावट बँक गॅरेंटी दिली होती. याबाबत आता पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी बनावट बँक गॅरेंटी देणार्या मध्ये बँकेचे अधिकारीही सहभागी असण्याची शक्यता आहे.