‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकांसह अॅमेझॉन प्राइमच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल
![Instructor-director of ‘Tandav’, author life-demonstration, some of Prime’s leading guides](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/tandav-aarest.jpg)
मुंबई – निर्माता अली अब्बास जफर याची ‘तांडव’ ही वेब सीरिज 15 जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली. आपल्या प्रदर्शनासोबतच ही वेब सीरिज वादात सापडल्याचे पहायला मिळतेय. या वेब सीरिजमधील शंकर आणि राम या हिंदू देवतांवर आधारित एक दृश्य आहे. त्यावरुन सोशल मीडियात वाद निर्माण झाला आहे. या वेबसीरीजविरोधात अनेकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अखेर रविवारी मुंबईत या वेबसीरीजविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशात अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक आणि लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ‘तांडव’ या वेबसीरीजचे निर्माते हिमांशू कृष्ण मेहरा, दिग्दर्शक अली अब्बास जाफर, लेखक गौरव सोलंकी यांच्यासह वेबसीरीजसंबंधी इतर लोक तसेच अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील ओरिजनल कटेंन्ट हेड अपर्णा पुरोहित यांच्याविरोधात लखनऊच्या हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, भाजपा आमदार राम कदम यांनी रविवारी मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात ‘तांडव’ वेब सीरीजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच भाजपाचे खासदार मनोज कोटक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रामविलास पासवान यांना पत्र लिहून ‘तांडव’वर बंदी घालण्याची आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सॉर आणण्याची मागणी केली होती.