ट्रम्प यांच्या विरोधात दुसऱ्यांदा महाभियोगाचा प्रस्ताव पारित; तसं होणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष
अमेरिकन हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हने ट्रम्प यांच्या विरोधातील ऐतिहासिक असा दुसरा महाभियोग प्रस्ताव पारित केला आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील हा महाभियोगाचा प्रस्ताव 232 विरुध्द 197 मतांनी पारित करण्यात आला. ट्रम्प हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांच्या विरोधात दोन वेळा महाभियोग प्रस्ताव पारित झाला आहे.
कॅपिटॉल हिलवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्याला ट्रम्प यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर करुन ट्रम्प यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यावरुन ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
डोनाल्ड ट्रम्प हे असे राष्ट्राध्यक्ष आहेत की ज्यांच्यावर दोन वेळा महाभियोगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यापूर्वी 2019 साली ट्रम्प यांच्यावर हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह ने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी युक्रेन मुद्द्यावरुन जो बायडेन यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतु या प्रस्तावाला सीनेटने 2020 साली नाकारले होते. सीनेटमध्ये त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होते.
ट्रम्प यांच्या आधीही तीन राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात असा महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून या आधी अॅन्ड्रू जॉनसन (1868), रिचर्ड निक्सन (1973) आणि बिल क्लिन्टन (1998) या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता.