सोमाटणे टोलनाका : व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणाचा स्थानिकांना त्रास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/17814426_110685102811141_536994851917397396_o.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे स्थानिकांसह वाहनचालक व प्रवासी त्रस्त आहेत. काही वाहनचालकांकडून अनेकदा लेनची शिस्तही पाळली जात नाही. ठेकेदाराकडून नाक्यावरील दोन्ही बाजूंची एक – एक लेन बंद ठेवली जात असल्याने गैरसोईत आणखी भर पडत आहे. त्यामुळे स्थानिकांना वेगळ्या लेनसह इतर लेनची व टोलवसुली खिडक्यांची संख्या वाढवून गैरसोय दूर करावी. अन्यथा स्थानिकांकडून आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सोमाटणे टोल व्यवस्थापनाला दिला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सोमाटणे फाटा येथे रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या संस्थेने नाका उभारून टोल वसुली सुरू केली आहे. काही वर्षांतच या महामार्गावरून ये – जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र लेनच्या संख्येत वाढ झालेली नाही. उलट नाक्यावरील दोन्ही बाजूकडील एक – एक लेन अनेकदा बंद ठेवली जात आहे. शनिवारी व रविवारी सर्वाधिक वर्दळ असते. त्या वेळी वाहनचालकांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही. टोल कर्मचारी अरेरावीची भाषा करतात.
टोल नाक्यावरील व्यवस्थापनही याबाबत कोणतेच पाऊल उचलत नाही. टोल नाक्यावरील दुर्तफा सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. रोजच्या वाहतूक कोंडीला स्थानिकांनाही सामोरे जावे लागत आहे. जिथे वाहनांना तीन मिनिटांचा वेळ लागणे आवश्यक आहे. तिथे तासाभराचा वेळ वाया गेल्याने ताटकळत बसावे लागते. रोजच्या वाहतूक कोंडीला स्थानिकांनाही सामोरे जावे लागत आहे. स्थानिकांनी जाब विचारताच टोल कर्मचारी अरेरावीची भाषा करतात. टोल व्यवस्थापनाने स्थानिकांना वेगळ्या लेनसह इतर लेनची व टोलवसुली खिडक्यांची संख्या वाढवून वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा. अन्यथा व्यवस्थापनाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे या पत्रकात विलास शिंदे यांनी म्हटले आहे.