संभाजी ब्रिगेड घालणार निष्क्रिय सरकारचे श्राध्द
- आक्षेपार्ह विधान करणारे श्री श्री रविशंकर यांना पाठबळ
- गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन कायम
पिंपरी / महाईन्यूज
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. त्याबाबत महाराष्ट्र सरकारने एक वर्ष होऊनही दखल घेतली नाही. याच्या निषेधार्त संभाजी ब्रिगेड या निष्क्रिय सरकारचे श्राद्ध घालणार आहे. महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. थेरगाव येथील स्मशान भूमीत शनिवार २ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी दिली आहे.
यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर त्याबाबत महाराष्ट्रभर निषेध झाला. विविध पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार तसेच अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली. रविशंकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली. मात्र, हे प्रकरण होऊन तब्बल ३६५ दिवस झाले. तरी देखील गुन्हा दाखल झाला नाही. पुरोगामी महाराष्ट्र व छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असलेल्या महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या व दखल न घेणा-या निष्क्रिय शासनाचा वर्षपुर्ती श्राध्द घालून निषेध करण्यात येणार आहे. याबाबत पुढे दखल न घेतल्यास हे आंदोलन महाराष्ट्रभर आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून हे आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, सचिव विशाल जरे, कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतारने संघटक ज्ञानेश्वर लोभे यांच्या स्वाक्षरी आहेत.