आजपासून एका मिनिटात 10 हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य
![Railway travellers will book 10 thousand ticket online from today Piyush Goyal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Piyush_Goyal_0.jpeg)
रेल्वे तिकीटांचं बुकिंग आजपासून सुपरफास्ट होणार आहे. रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांना आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार रेल्वे तिकीटांचं ऑनलाईन बुकिंग शक्य होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आज दुपारी आयआरसीटीसीची नवी वेबसाईट लॉन्च करणार आहेत. सध्या एका मिनिटात 7500 तिकीटं बुक होतात.
आयआरसीटीसीची वेबसाईट अपग्रेड झाल्यानंतर तिकीट बुकिंगचा वेग वाढणार आहे. परिणामी प्रवाशांना आधीच्या तुलनेत जास्त वेगाने तिकीट बुक करता येणार आहे. सोबतच आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे खाण्यापिण्यासह इतर सोयी-सुविधाही मिळणार आहेत, अशी माहिती रेल अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, “आयआरसीटीसी वेबसाईट ही रेल्वे प्रवाशांसाठी संपर्काचं पहिलं केंद्र आहे आणि हा अनुभव चांगला असावा. नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा ओढा आता आरक्षण खिडकीवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या दिशेने आहे. यासाठीच आयआरसीटीसीची वेबसाईट सातत्याने अपग्रेड करण्यासाठी आवश्यक आहे.”