पुणे जिल्ह्यातील शेवाळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार
![Villagers boycott Shewalewadi Gram Panchayat elections in Pune district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/निवडणुकीवर-ग्रामस्थांचा-बहिष्कार.jpg)
पुणे – जिल्ह्यातील शेवाळेवाडी ग्रामपंचायतीचा पालिकेत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि संभ्रम निर्माण झाला असून या ग्रामस्थांनी आता थेट ग्रामपंचायत निवडणुकीवरच बहिष्कार टाकला आहे.एकीकडे राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू असतानाच एखाद्या ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरची पहिलीच घटना आहे.
वाचा :-राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन
राज्य सरकारेने २३डिसेंबर रोजी अधिसूचना काढून २३ गावांना पुणे पालिकेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या २३ गावांमध्ये शेवाळेवाडीचाही समावेश आहे. शेवाळेवाडी ग्रामपंचायतीची पालिकेत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे ग्रामपंचायतीची निवडणूकही जाहीर झाल्याने गावातील अनेक इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन बैठक घेतली आणि सर्वानुमते या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार एकही ग्रामस्थ निवडणूक रिंगणात उतरणार नाही. शिवाय मतदानाच्या दिवशी कोणीही मतदानासाठी घराबाहेर पडणार नाही. दरम्यान, शेवाळेवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आधीपासूनच सुरू होती. या गावाची निवडणूक रद्द झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयात आली नाही. जोपर्यंत अधिसूचना येत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याचे सूत्रांनी सांगितले.