कॉंग्रेसच्या मंत्र्याचा रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळात उजव्यांना ‘हात’
![Congress Minister's Theater Experiment Supervision Board](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Amit-deshmukh.jpg)
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अडचणीत वाढ
मुंबई | प्रतिनिधी
नुकतीच सांस्कृतिक कार्य खात्यांतर्गत येणाऱ्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने सदस्यांची यादी जाहीर केली. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या खात्यात पुरोगामी विचाराला तडा दिला आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य निवड करताना चक्क उजव्यांना “हात” दिल्याने सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत १०५ आमदार येवून सुध्दा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने भाजपला सत्तेपासून दूर करून महाराष्ट्रात पुरोगामी विचाराचे महा विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. अर्थातच त्यानंतर सर्व महामंडळ आणि समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या तिन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या विविध महामंडळ आणि समित्यांवर आपली वर्णी लागण्यासाठी मंत्री आणि पुढाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहेत.
नुकतीच सांस्कृतिक कार्य खात्यांतर्गत येणाऱ्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने सदस्यांची यादी जाहीर केली.या यादीकडे कटाक्षाने नजर मारली तर चक्क पुरोगामी विचाराला तडा देत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी उजव्या विचाराच्या लोकांना आपले दोन “हात” पुढे करून या मंडळावर झुकते माप दिले आहे. यामुळे काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. या मंडळावर नियुक्त केलेल्या एका सदस्याचा तर एका व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. त्याने तर आपण कोणाच्या विचाराला बांधील आहे. हे स्पष्ट केले आहे.
सध्या सोशल माध्यमावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळांवर ज्येष्ठ नाट्य लेखक आणि दलित साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांची अध्यक्ष पदी निवड व्हावी म्हणून अनेकांनी आग्रह धरला होता. सांस्कृतिक कार्य मंत्री यांना ही याबाबत काही मान्यवरांनी फेब्रुवारी – मार्च महिन्याच्या दरम्यान भेटून मागणी केली होती. पण ना.देशमुख यांच्या चुकीच्या सल्लागारांनी गज्वी यांच्या नावाला विरोध करून दलित साहित्यिकांपेक्षा पुणेकर कसे अध्यक्ष पदासाठी श्रेष्ठ आहेत. हे पटवून देण्याचे काम केले. त्यामुळे अमित देशमुख यांनी त्यांच्या नावावर फुली मारली.
यामुळे आता सांस्कृतिक कार्य मंत्री चांगलेच अडचणीत सापडले असून त्यांच्या पक्षातील त्यांचे विरोधक या संधीचा फायदा घेत हा संपूर्ण “प्रताप” काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत, असे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. याबाबत प्रत्येक मुद्यांवर प्रतिक्रिया देणारे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांना याबाबत आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता,ते सुध्दा यावर काहीच बोलायला तयार नाहीत.