सोलापूर, कोल्हापूर, जळगाव जिल्ह्यांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील शाळा सुरू करा – संदीप काटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Sandip-kate.jpg)
- आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली मागणी
- निर्णयास विलंब केल्यास विद्यार्थ्यांचे होणार नुकसान
पिंपरी / महाईन्यूज
कोविड 19 चा प्रादुर्भाव विचारात घेता शाळा भरवण्यास राज्य सरकारचे अद्याप निर्बंध असले तरी राज्यातील 70 टक्के शाळा सुरू झाल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. त्यानुसार सुमारे 6 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थिती लावत आहेत. त्यामध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. याठिकाणी शाळा सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील मनपा आणि खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यात येत आहे. विद्यार्थी शाळेत जात नसल्यामुळे त्यांचे वार्षिक शालेय शूल्क भरण्यास पालक वर्गातून नकार येत आहे. पालक पैसे भरत नसल्यामुळे शाळा व्यवस्थापकांना शिक्षक व इतर कर्मचा-यांचे मासिक वेतन भागवणे अशक्य होत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे. शिक्षक आणि कर्मचा-यांचा खर्च भागवण्यासाठी संस्थाचालकांनी बँकेचे कर्ज घेतले आहे. सरकारच्या अशा धोरणामुळे संस्थाचालकांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापक मेटाकुटीला आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी प्रशासकीय स्तरावर हाचलाच होत नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे, अशी व्यथा काटे यांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना विषाणू पसरण्याचा वेग मोठा होता. त्यामुळे दरम्यानच्या परिस्थितीत शाळा सुरू करणे शक्य नव्हते. मात्र, गेल्या महिनाभरातील कोरोना संक्रमणाचा वेग पाहता बाधितांचा आकडा घटत चालला आहे. सुमारे 150 च्या आसपास हा अकडा तग धरून आहे. बाधितांची कमी होणारी संख्या पाहता राज्य सरकारने कोविड 19 चा प्रतिकार करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सोशल डिस्टंन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी. जेनेकरून शाळा व्यवस्थित चालतील, घरी बसून शिकणारे विद्यार्थी शाळेत हजेरी लावतील. घरी बसून शिकणा-या विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे नियंत्रण राहत नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्षावर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी शहरातील शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी काटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकारद्वारे केली आहे.
70 टक्के शाळा सुरू, 6 लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती
कोरोनानंतर राज्यातील 70 टक्के शाळा सुरू झाल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे सहा लाखांहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्षात वर्गात बसून शिक्षण घेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये १ लाख १३ हजार ४५५ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असून त्या खालोखाल कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक आहे. तर, पुणे जिल्ह्यात ४८ हजार ४५३ विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येऊन शिक्षण घेत आहेत. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेल्या भागात शाळा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात राज्यातील अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार २३ डिसेंबर रोजी राज्यातील ९ हजार १२७ शाळांमध्ये २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थी कोरोनानंतर शाळेत दाखल झाले. तर, २ डिसेंबर रोजी ११ हजार ३२२ शाळांमध्ये येणा-या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ९१ हजार ९६२ एवढी होती, अशी माहिती समोर आल्याचे काटे यांनी म्हटले आहे.