भारतीय महिलांचा स्पेनवर विजय
पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेत 1-1 बरोबरी
माद्रिद – कर्णधार राणी रामपालने केवळ एक मिनिट बाकी असताना केलेल्या बहुमोल गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने तिसऱ्या हॉकी कसोटी सामन्यात स्पेनवर 3-2 अशा रोमांचकारी विजयाची नोंद केली.
पहिल्या सामन्यात 0-3 असा एकतर्फी पराभव पत्करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बलाढ्य स्पेनला 1-1 असे बरोबरीत रोखताना चमकदार कामगिरी बजावली होती. मात्र आजचा तिसरा सामना जिंकून भारतीय महिला हॉकी संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तीन सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील चौथा सामना आज रात्री उशिराने खेळविण्यात येणार आहे.
स्पेनच्या महिला संघाने पहिल्या दोन सामन्यातील पूर्वार्धात वर्चस्व राखताना भारतीय महिला संघाला निष्प्रभ केले होते. परंतु भारतीय महिला संघाने आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करताना विजय मिळविण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. आजच्या तिसऱ्या सामन्यातही पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. परंतु स्पेनला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर बेर्टा बोनास्ट्रेने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल करताना स्पेनला 1-0 असे आघाडीवर नेले.
पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिला संघाने दुसऱ्या सत्रात आपल्या खेळात खूपच सुधारणा केली. इतकेच नव्हे तर 19व्या मिनिटाला स्पेनला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारतीय महिलांनी गोल होऊ दिला नाही. तसेच 25व्या मिनिटाला भारतीय महिलांच्या अप्रतिम आक्रमणावर स्पेनची गोलरक्षक मेलॅनी गार्सियाने अप्रतिम सेव्ह केला नसता, तर तेव्हाच बरोबरी साधली गेली असती. अखेर 28व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गुरजित कौरनी भारताला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला 1-1 अशी बरोबरी कायम राहिली.
तिसऱ्या सत्रात भारतीय महिलांनी आक्रमणाचा वेग वाढविला. परंतु कारकिर्दीतील 200वा सामना खेळणाऱ्या वंदना कटारियाला लक्ष्यवेध करता आला नाही. सामन्याच्या परंतु लालरेमसियानीने 32व्या मिनिटाला भारतीय महिलांना आघाडीवर नेले. अखेरच्या सत्रात 58व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर लोला रिएराने स्पेनच्या महिलांना 2-2 अशी बरोबरी साधून दिली. परंतु हा साना बरोबरीतच सुटणार असे दिसत असताना 59व्या मिनिटाला राणी रामपालने अफलातून मैदानी गोल नोंदविताना भारतीय महिलांना सनसनाटी विजय मिळवून दिला.