रुपाली चाकणकरांकडून नाव, फोटो, वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन; विनापरवाना वापरल्यास कारवाईचा इशारा!

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आता आपले नाव, फोटो, ओळख आणि वैयक्तिक शैलीची अधिकृतपणे ट्रेडमार्क (Trademark) नोंदणी केली आहे. स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून (ट्विटर) पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. यापुढे पूर्वपरवानगीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी फोटो, व्हिडिओ, रील्स किंवा कोणतेही प्रमोशनल साहित्य तयार करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाची कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा चाकणकर यांनी दिला आहे.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या नावाची आणि शैलीची ट्रेडमार्क नोंदणी नेमकी का केली, याचे स्पष्ट कारण त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलेले नाही. मात्र, त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर रील्स बनवणारे किंवा त्यांचा संदर्भ वापरणाऱ्या नेमक्या कोणत्या व्यक्ती किंवा गटाला त्यांनी हा कायदेशीर इशारा दिला आहे, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार तर्क-वितर्क लावले जात आहेत.
आपली भूमिका स्पष्ट करताना चाकणकर यांनी लिहिले की, “माझे नाव, माझा फोटो, माझी ओळख, माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत, यासंदर्भात अधिकृत ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे.”
माझे नाव,माझा फोटो,माझी ओळख,माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे.
माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो,ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी,वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास,अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 15, 2026
हेही वाचा
पुढे कायदेशीर इशारा देताना त्यांनी म्हटले की, “माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील्स, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.”
राजीनाम्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय
दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला होता. आता त्यांनी उचललेल्या या ‘ट्रेडमार्क’ नोंदणीच्या पावलामुळे पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.




