दाक्षिणात्य अभिनेत्री वीजे चित्रा हिची आत्महत्या
मुंबई – गेल्या काही काळात अनेक मोठ्या आणि प्रतिभावान लोकांच्या आत्महत्यांनी समाजमन हादरुन गेले आहे. त्यातच आता मनोरंजन विश्वासाठी आणखी एक धक्कादायक घटना समोर येते आहे. साऊथमधील आयकॉनिक अभिनेत्री व्ही जे चित्रा हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अवघ्या 28 वर्षांच्या चित्राच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला असून मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिचा काही दिवसांपूर्वी उद्योजक हेमंत रवि यांच्याशी साखरपुडा झाला होता. दरम्यान, चित्राच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
वाचा :-जम्मू-काश्मीरमध्ये सिंगपुरा येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 3 नागरिक जखमी
चित्राने 2013 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी अँकर म्हणून कारकीर्द सुरू केली. व्हीजे चित्रा म्हणून तिने मनोरंजन विश्वात नाव कमावलं. मन्नन मंगल मालिकेतून चित्राने मालिका विश्वात पाऊल ठेवले, तिने केलेल्या मोजक्या मालिकांपैकी वेलुनाची मालिकेतील तिची मुख्य भूमिका गाजली होती. तसेच विजय टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या पेंडियन स्टोअर्स या प्रसिद्ध मालिकेतील भूमिकेमुळे चित्रा चांगलीच प्रसिद्धीला आली होती. या मालिकेत तिने मुल्लाईची भूमिका निभावली आहे. चित्राला नैराश्याने ग्रासले असल्याचे बोलले जाते. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तिने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, ईव्हीपी फिल्म सिटीमधील शूटिंगनंतर चित्रा रात्री 2.30 वाजता हॉटेलमध्ये परतली होती. ती हॉटेलमध्ये हेमंतसोबत राहत होती. हेमंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, हॉटेलवर आल्यानंतर चित्राने सांगितले की ती अंघोळीसाठी जात आहे. मात्र ती बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. दरवाजा वाजवल्यानंतरही काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर हेमंतने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता चित्राचे शव लटकलेल्या अवस्थेत आढळले.