महासभेत शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ हल्लाबोल; राष्ट्रवादी, शिवसेनेची नारेबाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/IMG-20201208-WA0001.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधाचे पडसाद आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी शेतकरी व कामगार विरोधी कायदे करणा-या केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्त काळा पोषाख परिधान करून सभागृहात प्रवेश केला. शिवसेनेने देखील केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
शेतकरी विरोधी कायदे करणा-या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात देशभरातील शेतक-यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिल्याने देशभरातील बहुतांश राजकीय, सामाजिक, कामगार संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी देखील काळ्या फिती लावून कामावर हजर राहत भारत बंदला पाठिंबा घोषीत केला आहे.
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक राजू बनसोडे, माजी महापौर मंगला कदम आदी नगरसेवक, पदाधिका-यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महासभेला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे ज्या कारणासाठी भारत बंद घोषीत केला त्या शेतकरी व कामगार काद्याच्या विरोधाचे पडसाद आज महासभेत देखील उमटल्याचे पहायला मिळाले.
सभेत विरोधी पक्षनेते मिसाळ म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले कायदे शेतकरी व कामगारांना मान्य नाहीत. त्यांनी या कायद्याला जाहीरपणे विरोध दर्शविला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा केली आहे. सर्वच क्षेत्रातून भारत बंदला पाठिंबा मिळत असताना आपण देखील सर्वसाधारण सभा तहकूब ठेवणे योग्य ठरेल. तरी, आजची सभा तहकूब करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे केली.