‘कृषी कायदा रद्द होणार नाही’, चंद्रकांत पाटलांचं ठाम वक्तव्य
![Ashok Chavan's statement regarding Maratha reservation is ignorance - Chandrakat Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/chandrakant-patil.jpg)
पुणे – गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. हे कायदे मागे घ्यावेत आणि शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा या मागण्या मान्य होण्यासाठी शेतकऱ्यांनी जोर धरला आहे. मात्र, हे कृषी कायदे काहीही केल्यास रद्द होणार नाही अशं ठाम वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना दादांनी कायदा रद्द होणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. ते पुण्यात आजोयित कार्यक्रमात बोलत होते.
केंद्राने कृषी कायद्यावर शहाणपणाची भूमिका घ्यावी असं पवारांनी म्हटलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटलांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होतं तेचं आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
वाचा :-कृषी कायद्याविरोधात बातचीत करण्यासाठी शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार
कृषी कायद्याविरोधात देशभर आंदोलन पेटलं आहे. राजधानी दिल्लीच्या वेशीवर अनेक शेतकऱ्यांनी बस्तान मांडलं आहे. केंद्र सरकारसोबतच्या पाच चर्चा निष्फळ ठरल्याने आता तरी यावर तोडगा काढावा अशी मागणी शरद पवारांनी केली. तसेच, हा कायदा रद्द करावा असंही ते म्हणाले. मात्र, कायदा रद्द होणार नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘प्रश्न फक्त एमएसपीचा होता. केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आपण आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही. फक्त कायद्यात बदल केला जाईल.’ असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.
इतकंच नाही तर देशात केलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यावरती चंद्रकांत पाटलांनी बोलताना भेटीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकशाही आहे. लोकशाहीत कोणीही भेट घेऊ शकतं. भेट घेत असतील तर त्यांचं स्वागत आहे असं टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.