Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शाळेची पहिली घंटा खणाणली

पिंपरी – शाळेचा पहिल्याच दिवस…, सर्व परिसरात चैतन्य पसरले होते…, कोणाचा रडण्याचा आवाज…, कोणाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची झुळूक…, तर नवे कोरे शैक्षणिक साहित्य कुतुहलाने पाहणारे बालचमू… अशा वातावरणात आज (शुक्रवारी) शहरातील शाळांची पहिली घंटा वाजली. गेली दोन महिने सुनसुने असलेल्या शाळा आज बोलक्‍या झाल्या. पालक, रिक्षा, बसेसची गर्दी यामुळे शाळेचा आवार भरून गेला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचे लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक संस्था, संघटनांनी जोरदार स्वागत केले.

शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रस्तुत केलेल्या पत्रकानुसार शाळेतील मुलांच्या स्वागतासाठी सर्व शिक्षक वर्ग सुसज्ज होता. शाळा सजवण्यात आल्या होत्या. बच्चे कंपनींचे आवडते कार्टुन कॅरेक्‍टरर्स स्वागतासाठी सज्ज होते. पहिल्याच दिवशी शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला होता. या उपक्रमाला महापालिकेच्या शाळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापलिकेच्या 105 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये 87 मराठी, उर्दू 14, हिंदी 2, इंग्रजी 2 शाळांचा समावेश आहे. महापालिकेच्या प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळाने वेगवेगळ्या पाच शाळेत लोकप्रतिनिधीसोबत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या वेळी महापालिकेतील शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे, शिक्षण मंडळ सहप्रशासन अधिकारी पराग मुंढे यांनी नियोजित शाळेला भेटी दिल्या तसेच उपक्रमात सहभाग घेतला. महापालिका शाळांमधील मुलांना पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तक, रेनकोटचे वाटप करण्यात आले. शालेय गणवेशाबरोबर पिटी गणवेश देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी हरखून गेले होते.

अजंठानगर येथील कन्या आणि मुलांच्या शाळेत रांगोळी काढण्यात आली. मुलांचे औक्षण करण्यात आले. मुलांच्या हातात फुगे तसेच चॉकलेट देण्यात आले. पिंपळे गुरव येथील प्राथमिक शाळेत प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे आणि स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत मुलांचे स्वागत करण्यात आले. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या अजून निश्‍चित झाली नाही. विद्यार्थ्यांचे पहिलीचे प्रवेश हे सप्टेंबरपर्यंत सुरू असतात. त्यामुळे पटसंख्या निश्‍चित होण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत वाट बघायला लागणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली.

भारिप बहुजन महासंघ प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर व संघटनेचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड यांच्या हस्ते नेहरुनगर येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले. यावेळी भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, डॉ. छाया शिंदे, भारिप युवक आघाडी पुणे शहराध्यक्ष विकास साळवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, मुख्याध्यापक एच. बी. दळवी, दिलीप जाधव, एस. व्ही. गिरी, कक्ष अधिकारी सुजाता गोळे, फुलचंद जोगदंड, माऊली सोनवणे, उत्तम जोगदंड, संजय जाधव, तुकाराम गायकवाड, गुलाब पानपाटील, विष्णु सरपते, भैय्यासाहेब मिसळे, निशिकांत भालसैन, बाळासाहेब भालसैन, विठ्ठलराव ओव्हाळ, अक्षय साळवे आदी उपस्थित होते.

रुपीनगर येथील ज्ञानप्रभात विद्या मंदिर व विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल गवळी, कामगार नेते इरफान सय्यद यांच्या हस्ते मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, नगरसेविका अरुणा भालेकर, शरद भालेकर, दीपक जाधव, प्रमोद शिंदे, संजीवन कांबळे, अनिता साबळे आदी उपस्थित होते.

“यशस्वी’तर्फे शिक्षण जनजागृती फेरी
भोसरी येथील यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने परिसरात शिक्षण जनजागृती फेरी काढण्यात आली. संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्लिश माध्यमातील शाळांचे विद्यार्थी या फेरीमध्ये सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. औक्षण करुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button