वरावरा राव यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, वैद्यकीय उपचारांसाठी परवानगी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/755562-raovaravara-111818.jpg)
मुंबई – भीमा कोरेगाव प्रकरणी तळोजा कारागृहात अटकेत असलेल्या वरावरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना उपचारांसाठी परवानगी देण्यात आली आहे. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार आहेत. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी राव यांच्या पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना उच्च न्यायालयाने राव यांच्यावर पुढील १५ दिवस नानावटी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली आहे.
मात्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय राव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाहीये. २०१८ पासून कारागृहात असलेल्या वरवरा राव यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचं कारण देत पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कारागृहात राव यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.
वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी राव यांच्या पत्नी हेमलता यांची बाजू कोर्टात मांडली. राव हे गेल्या काही महिन्यांपासून अंथरुणावर खिळून आहेत. तसेच त्यांना लिव्हरचा त्रासही होत आहे. यावर योग्यवेळेत उपचार न झाल्यास त्यांचा जीव जावू शकतो आणि ही कस्टोडीअल डेथची केस बनेल असा युक्तीवाद जयसिंग यांनी केला. प्रत्युत्तरादाखल NIA च्या वकिलांनी राव यांची प्रकृती खालावलेली असली तरीही डॉक्टर त्यांची काळजी घेत असल्याचं सांगितलं. यावर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने राव यांना नानावटी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.