किम भेटीनंतर ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेने पेंटॅगानही चकित
वॉशिंग्टन (अमेरिका) – किम जोंग उन यांच्याबरोबरच्या शिखर परिषदेनंतर ट्रम्प यांनी केलेल्या एका घोषणेनंतर मित्रराष्ट्र दक्षिण कोरियाच नाही, तर दस्तुरखुद्द पेंटॅगॉनही चकित झाले आहे. कोरियन द्वीपकल्पातील दक्षिण कोरियाबरोबरचा लष्करी सराव बंद करण्याची घोषणा ट्रम्प यांनी करून टाकली आहे.
ट्रम्प यांच्या घोषणेचा काय परिणाम झाला याची माहिती जमा करण्याचा प्रयत्न पेंटागॉन, अमेरिकेच परराष्ट्र मंत्रालय आणि व्हाईट हाऊसचे अधिकारी करत आहेत.
संरक्षण मंत्रालय व्हाईटहाऊसच्या सहकार्याने मित्रराष्ट्रांबरोबर काम करीत राहणार असून याबाबत अधिक माहिती आम्ही वेळोवेळी देत राहू; असे निवेदन पेंटॅगॉनचे प्रवक्ता ख्रिस्तोफर लोगान यांनी एका ई-मेलद्वारे केले आहे. किम आणि ट्रम्प यांच्या भेटीने अंतिम शीतयुद्धाची समाप्ती झाल्याचे बोलले जात असले, तरी सेऊलबरोबर युद्धाभ्यास बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेने दक्षिण कोरियाला धक्काच बसला आहे. उत्तर कोरियाच्या विरोधात दक्षिण कोरियाला युद्धसज्ज ठेवणे आणि बड्या शक्तींपासून दक्षिण कोरियाला सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रित वार्षिक युद्धाभ्यास ही एक अनिवार्य बाब आहे.
त्यासाठी तयारी चालूच असल्याची माहिती दक्षिण कोरियातील अमेरिकन सैनिकांनी दिली आहे. मागील वर्षी या युद्ध सरावात 17,500 अमेरिकन जवानांनी आणि 50,000 दक्षिण कोरियन जवानांनांनी भाग घेतला होता. ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम अमेरिका आणि दक्षिण कोरिया, दोघांच्याही लष्करी सामर्थ्यावर होणारा आहे.