मुंबईत कोरोना लसीच्या वितरणाची पालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी
![The dry run of corona vaccination will be held on January 2 in ‘Ya’ 4 districts of the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/vaccine-1.jpg)
मुंबई – सध्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तब्बल सात महिने कोरोनाशी लढा दिल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत आहे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्तरावर पीछेहाट करणाऱ्या कोरोनाला मात देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. तर आता पालिका प्रशासन कोरोना लसीच्या वितरण प्रक्रियेची जोरदार तयारी करत आहे. कोरोना लस आल्यावर मुंबईत पहिल्यांदा आरोग्य सेवकांना ही लस दिली जाणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
जगभरात अनेक ठिकाणी कोरोना लसीवर संशोधन केले जात आहे. या संकटाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लवकरच लसही उपलब्ध होणार आहे. ही लस सर्वप्रथम वैद्यकीय कर्मचारी, कोविड लढ्यात प्रत्यक्ष सहभागी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागनिहाय माहिती घेऊन आरोग्य शिबीर आयोजित केले जातील. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच ही लस लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खाजगी दवाखाने, आरोग्य केंद्र यांचे सहकार्य घेणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
शासकीय कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत.
दरम्यान, मुंबईतील नायर आणि केईएम रुग्णालयांत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. ही लस आतापर्यंत १६३ स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील कोणत्याही स्वयंसेवकांना याचे दुष्परिणाम जाणवलेले नाहीत.