महापौरपदाचा अवमान केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/kunda-bhise.jpg)
- भाजपच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षा कुंदा भिसे यांची मागणी
पिंपरी / महाईन्यूज
महापौर उषा उर्फ माई ढोरे या पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक संबोधल्या जातात. पिंपरी-चिंचवडमधील 25 लाखांहून अधिक नागरिकांचे त्या प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्याविषयी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी अपशब्द वापरल्याने महापौर पदाचा अवमान झाला आहे. याबाबत मिसाळ यांनी त्वरीत माफी मागावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांनी केली आहे.
महापौर पदाची एक विशेष गरिमा असून त्याचा मान ठेवणे शहरातील तमाम नागरिकांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांचे सुध्दा कर्तव्य आहे. जम्बो कोविड सेंटरमधील कर्मचा-यांचे वेतन दिले नसल्यामुळे कर्मचारी नाराज झाले. त्यांची नाराजी समजून घेण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी कार्यतत्परता दाखवून मार्ग काढण्याच्या अनुषंगाने बुधवारी (दि. 21) जम्बो कोविड सेंटरला भेट दिली. त्यांच्यासोबत पक्षनेते नामदेव ढाके आणि स्थायी समिती सभापती संतोष लोंढे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले असते तर कर्मचा-यांवर ही वेळ आली नसती, अशी चर्चा झाली.
यावरून महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी महापौरांवर खालच्या पातळीचे आरोप केले. ‘महापौरांचे काम म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशा शब्दांत मिसाळ यांनी आरोप केला. मुळात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक शब्द देखील उच्चारला नाही. तरी देखील मिसाळ यांनी महापौरांवर असा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. मिसाळ यांच्या आरोपाने महापौर पदाच्या गिरिमेला धक्का पोहोचला आहे, अशी खंत अध्यक्षा भिसे यांनी व्यक्त केली.
महापौर पदाला विशेष महत्व प्राप्त असते. महापौर हे पद शहरातले प्रथम नागरिक म्हणून गणले जाते. या पदावरून उषा उर्फ माई ढोरे या पिंपरी-चिंचवडमधील 25 लाखांहून अधिक लोकांचे नेतृत्व करतात. त्यांच्याबाबत अशा शब्दांत टिका करणे म्हणजे महापौर पदाचा अवमान केल्यासारखे आहे. त्यामुळे मिसाळ यांनी याबाबत त्वरीत माफी मागावी, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा अध्यक्षा कुंदा भिसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.