अभिनेत्री दीपाली सय्यदला बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी
![Crime of killing goon Gajanan after his release from Taloja jail](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/crime7.jpg)
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद हिला बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी रविवारी अहमदनगर येथून एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
संदीप वाघ असे आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षभरापासून तो सय्यद हिला त्रास देत आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये दीपाली अहमदनगरमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघ याने कुणाकडून तिचा संपर्क क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तो कारण नसताना कॉल आणि मेसेज करत होता. त्यावर सय्यदने त्याला ब्लॉक केले. ४ ऑक्टोबरला त्याने पुन्हा कॉल केला. वर्षभरापासून त्रास देणारा वाघ असल्याचे दीपाली यांना तेव्हा समजले नाही. मी अहमदनगरमधील पाथर्डी येथून बोलत असून वाढदिवसाच्या पार्टीला येणार का असे त्याने विचारले. त्यावर वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्याचे एक लाख रुपये घेत असल्याचे तिने समोरील व्यक्तीला सांगितले. त्यावर वाघ याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करेन, असे दीपालीने त्याला बजावले.
त्यांनतर तिला बलात्कार करण्याची आणि अहमदनगरमध्ये आली तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी त्याने दिली. या धक्कादायक प्रकारानंतर दीपालीने तिच्या भावाशी संपर्क साधून सर्व घडलेली हकिकत सांगितली. तिने आरोपीचा क्रमांकही भावाला पाठवला. नंतर त्यानेही संपर्क साधून त्याला जाब विचारला असता त्यालाही शिवीगाळ केली. ती ड्रग पुरवते असे खोटेही त्याने तिच्याबद्दल सांगितले. अखेर दीपालीने ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी वाघ याला अटक करून न्यायालयात हजर केले.